गंगापूर धरणातून १० हजार क्युसेकने विसर्ग, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

गंगापूर धरणातून १० हजार क्युसेकने विसर्ग, गोदावरीला पूर येण्याची शक्यता, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या पश्चिम पट्ट्यासह गंगापूर पाणलोट क्षेत्रातील नाशिक , त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरात पावसाचा जोर वाढला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ झाली असून गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील संततधार पावसामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून यामुळे गंगापूर पाणलोट धरण समूहात पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.

यासाठी आज (दि. ११ जुलै २०२२) सकाळी व दुपारी गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आला आहे.

त्यामुळे सकाळपासून गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शिवाय सायंकाळी देखील गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येणार असल्याने पुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान आज रात्रीपर्यंत गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होणार असून शहराच्या काही भागात पाणी शिरणार असल्याने सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनूसार गंगापूर धरणाचे कॅचमेंट एरिया असलेल्या अंबोली परिसरात काल रात्री 12.00 ते सकाळी 06.00 या कालावधीत 160 मिलिमीटर पाऊस झालेला आहे आणि आज सकाळी 06.00 वाजल्यापासून 12.00 वाजेपर्यंत 80 मिलिमीटर झाला आहे. यामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊन पाणीसाठा 65 टक्के झाला आहे.

गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आल्याने गोदापात्रात सकाळपासून 9 टक्के वाढ झाली आहे. ही सर्व परिस्थुती बघता गोदापात्रात विसर्ग 10 हजार क्युसेक पर्यंत सायंकाळी 05.00 ते 06.00 वाजेपर्यंत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ही परिस्थिती आल्यास होळकर पुलाखाली म्हणजेच रामकुंड परिसरात सायंकाळ नंतर 15000 ते 20000 क्युसेक विसर्ग राहील, दहीपुलाला पाणी लागण्यासोबतच जुने नाशिक व इतर परिसरामध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे.

शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा:
गंगापूर धरण समूह परिसरात मुसळधार सुरु असल्याने गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी 12 वाजता 3000 क्युसेक, दुपारी ०१ वाजता 5500 क्युसेक, तर 05.00 ते 06.00 वाजेपर्यंत 10 हजार क्युसेक, सायंकाळनंतर 15000 ते 20000 क्युसेक विसर्ग होण्याची शक्यता आहे. गोदावरी नदीपात्रासह नांदूरमध्यमेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात पाणवेलींनी बस्तान बसविल्याने या पाणवेली काढून देण्यासाठी काल रविवार (दि.10) रोजी नांदूरमध्यमेश्वर धरणाचे सर्व आठ दरवाजे उघडण्यात येवून या दरवाजातून 6300 क्यूसेकच्या विसर्गाबरोबरच नदीपात्रातील व धरणातील पाणवेली देखील वाहून जावू लागल्या आहेत.