खळबळजनक : घराजवळ बसण्याच्या किरकोळ वादातून पिता-पुत्राचा खून….

नाशिक (प्रतिनिधी) : पिंपळगाव बसवंत येथे राहणाऱ्या दोघा पिता-पुत्राचा घराजवळ बसण्याच्या वादातून खून केल्याचा धक्कादायक प्रकार गणेश विसर्जनाच्या दिवशी घडला.

अंबिका नगर परिसरात गणपती विसर्जनाच्या दिवशी (दि.०१) दुपारी १ वाजेच्या सुमारास घराजवळ बसण्याच्या किरकोळ कारणावरून शिंदे आणि धाडीवाल या दोन कुटुंबांमध्ये वाद झाले. त्यानंतर धाडीवाल कुटुंबातील दोन युवकांनी शिंदे कुटुंबातील दोघा बाप-लेकावर धारदार शास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात बाप पुंडलिक शिंदे (वय ६७) आणि मुलगा माणिक शिंदे (वय ४०) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना दोघांचाही काल (दि.०३) मृत्यू झाला. याप्रकरणात पिंपळगाव पोलिसांनी विकी धाडीवाल (वय २७) आणि अजय धाडीवाल (वय १९) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून या संशयित आरोपींना अटक केली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.