कोरोना तांडव… एक अकल्पित, गूढ सत्य.. माहिती नसेल तर नक्की वाचा !

डॉ.सचिन कौतिकराव देवरे, जनरल व लॅपरोस्कोपीक सर्जन
काल पर्वा टीव्ही वर समजणारा आणि कॉलर tune ने ओळख करून दिलेला कोरोना आता पार घरा दारात येऊन पोहोचला आहे.
कोणी अनावश्यक भीतीने जास्तीचे काढे पिऊन उगीचच काळजी पोटी पोट खराब करून घेतले तर कोणी कोरोना वैगेरे पैसे कमवायचे नाटक आहे असे म्हणून बिनधास्त गावभर फिरत राहील…
माझ्या मुलाच्या लग्नालाच बरा कोरोना म्हणून काहींनी हजारोंच्या पंक्ती उठवल्या तर माझ्या खूप जवळचा आहे म्हणत काहींनी विविध कार्यक्रमात हजेऱ्या लावल्या…
जेव्हा फक्त दोन अंकी संख्या असायची तेव्हा कुत्री सुद्धा रस्त्यावर दिसत नव्हती आणि आता हजारो रुग्ण रोज येतात तरी कोणीच मागे हटायला तयार नाही…

जेव्हा काहीच नव्हते तेव्हा मोबाईल, टीव्ही,वृत्तपत्रे, डोक्यात, मनात सगळीकडे कोरोना होता, आता सगळीकडे खरच कोरोना आहे पण वरीलपैकी कुठेच फारसा जाणवत नाही…
आर्थिक भार नको म्हणून सरकार ही कडक निर्बंध लावायला मागेपुढे पाहत आहे.. पण प्रशासन आणि सरकार ही काय काय करणार… आपली जबाबदारी सरळ सरकार वर झटकून मोकळ व्हायचं, डॉक्टरांना आणि हॉस्पिटलला दोषी ठरवून उपदेश पाजायचे आणि स्वतः साधा मास्क सुद्धा नीट लावायचा नाही…

लक्षात ठेवा ज्या देशात किंवा ज्या भागात जास्त कोरोना चे थैमान सुरू आहे त्या त्या भागातील लोक हे अतिशय बेफिक्रिने वागणारे आहेत.
सध्याची परिस्थिती माहिती नसेल तर नीट लक्षात घ्या, कोरोना चे कधीही न पाहिलेले तांडव सध्या सुरू आहे, पैशाचा आणि पदाचा माज असेल तर विसरून जा, खूप मोठ्या पदाच्या आणि खूप गडगंज संपत्ती असलेल्यांना रस्त्यावर बेड साठी, ऑक्सिजन साठी, इंजेक्शन साठी भिक मागताना आम्ही पाहिलेलं आहे, बघवत नाही..

एवढ्या लोकांना पुरेल अशी कोणतीच यंत्रणा आपल्याकडे ह्या घडीला नाही..कुठल्याही गावात जे बॅनर आज नेहमी पेक्षा दुपटीने लागले आहेत आणि ज्यावर आपल्या लाडक्या पुढाऱ्यांचा फोटो नसून आपल्यातील ओळखीचा फोटो आहे त्यातील बहुतांश कोरोनाने गेलेले आहेत.
कोरोना वर इलाज नाही मग हॉस्पिटल बिल कसले घेतात म्हणणारे आणि वॉट्स अप वर पोस्ट फिरवणारे स्वतः वर बितते तेव्हा बेड देता का बेड म्हणत विनवण्या करता आहेत. कोरोना वर योग्य वेळी, सौम्य लक्षण असताना इलाज केला तर नक्कीच विजय मिळवता येतो, एका लिमिट बाहेर गेल्यावर आम्हीही हतबल होतो.

ह्या लाटेत बरेच लोक सौम्य लक्षणात सावरता आहेत हीच काय ती जमेची बाजू,पण त्यातही काही लोक ह्याच गोष्टीचा बाऊ करून काहीच होत नाही म्हणत खूप लोकांना प्रसाद वाटप करतात, त्यातील काही सीरियस होवून जमा होतात आणि बरेचसे आधी हॉस्पिटल ला बेड मिळण्याच्या रांगेत आणि नंतर स्मशान भूमीत नंबर लागे पर्यंत ताटकळत राहतात, परिस्थिती भयावह आहे.. हॉस्पिटल मधील नर्स, डॉक्टर, कर्मचारी स्वतः कोरोना शी दोन हात करत रात्रंदिवस राबता आहेत पण आता सगळे थकले आहेत, वस्तूंचा प्रचंड तुटवडा आहे, कधी Remdesevir नाही मिळत तर कधी ऑक्सिजन,कधी बेड खाली नसतो तर कधी व्हेंटिलेटर…
तारेवरची कसरत चालू आहे.

माझी तमाम जनतेला हात जोडून विनंती आहे, तुम्हाला तुमच्या जीवाची पर्वा नसेल तर सरळ बॉर्डर वर जा तिथे तुमच्या जिवाचं नक्कीच चीज होईल, देशोपायोगी ठरेल परंतू स्वतः निष्काळजी पणाने वागून अख्या घरादाराला आणि संपूर्ण राष्ट्राला बरबाद करू नका..
संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती मग ती बायको,नवरा,आई, वडील,भाऊ बहीण कोणीही असो,positive आहे असे समजूनच व्यवहार करा,कारण सगळ्याच रुग्णांना लक्षणे नसतात. सर्व पार्ट्या, एकत्र बसणे बंद करा..

गरज नसताना बाहेर पडू नका, आणि जावच लागलं तर चांगल्या प्रतीचा मास्क नाक आणि तोंड पूर्णपणे झाकेल असाच पूर्णवेळ लावून ठेवा..
अंतर ठेवा, गर्दी करू नका आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. कुठलेही औषध,गोळ्या,काढे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.. घरात वयोवृद्ध लोक असतील किंवा पूर्वीचे आजार असतील तर तुम्ही स्वतः जास्त काळजी घ्या.
ब्रेक द चेन तेव्हाच शक्य आहे जेव्हा एकूण एक व्यक्ती जबाबदारीने वागेल… पोलिस सांगतील किंवा प्रशासन दंड करेल याची वाट बघत बसण्यापेक्षा प्रत्येक बिना मास्क च्या व्यक्तीला किंवा मास्क व्यवस्थित नसलेल्या व्यक्तीला समज द्या,वेळ आली तर कडक शब्दात समजावा असे केलं तर कोणाचा तरी जीव वाचवण्याचे पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल.
मित्रांनो कोरोना कधी आणि कसा जाईल माहिती नाही,संभ्रम आम्हालाही आहे,जीव आम्हालाही आहे,कुटुंब आम्हालाही आहे परंतु सध्या ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत किमान तेव्हढ्या तरी आपण केल्याचं पाहिजेत, नाहीतर येणाऱ्या काळात फक्त आणि फक्त मृत्यू तांडव पहावं लागेल.

सर्वांना कळकळीची विनंती आहे, लग्न समारंभ, मुंज, अंतिम क्रिया, दशक्रिया असल्या अनेक कार्यक्रमात दिसुच नका!
आज आपण सर्वांनी ठरवले तरच कोरोना पासून मुक्त होवू शकू, एकट्या दुकट्या ने किंवा आरोग्य विभागाने किंवा प्रशासनाने ठरवून काहीच होणार नाही. तुम्हाला लॉक डाऊन लावून घरात कोंडून ठेवणे हे तुमच्याच निष्काळजी पणाच फळ असणार आहे,आणि यात अनेक कष्टकरी, मजूर भरडले जाणार आहेत. सर्वांनी काळजी घ्या आणि कोरोना कसा थांबवता येईल, वैयक्तिक पातळीवर कसा दूर ठेवता येईल याची वेळोवेळी खबरदारी घ्या.
काही दिवस संयम ठेवा, उरलेला काळ आपलाच असणार आहे. जय हिंद!

( टीप – ज्या लोकांना हा लेख वाचून ही काहीच गांभीर्य नसेल त्यांनी कोरोनाने गेलेल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या घरी फोन करून वरील गोष्टींची खातरजमा करून घ्यावी. किंवा तरीही फिरायचेच असेल तर एक दिवस तुमच्या जवळील कोरोना रुग्णालयात जाऊन बाहेर उभ राहून दिवसभर होणाऱ्या घटना पहाव्यात तरीही नाही पटल तर सहज जमेल त्या वेळेत स्मशानभूमीत किंवा कब्रीस्तनात फेरफटका मारून यावा, सगळे भ्रम दूर होतील)