कोरोनाने आईचा मृत्यू, सॅनिटायझर पिऊन मुलीचीही आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्याचा धक्का २० वर्षीय मुलीला असह्य झाल्याने रविवारी (दि. २) येथील कोविड सेंटरच्या आवारातच तिने ज्याने कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहता येते ते सॅनिटायझरच पिऊन आत्महत्या केली.

पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार २९ एप्रिलला जयाबाई लक्ष्मण भुजबळ या कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्यावर नाशिकरोड येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले. मुलगी शिवानी आईची देखभाल करत होती. रविवारी (दि. २) जयाबाई यांचा मृत्यू झाला. शिवानीला हा धक्का सहन झाला नाही. जवळ असलेले सॅनिटायझर घेऊन रुग्णालयाबाहेर येत तिने ते पिऊन घेतले. भावाने तिला त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, तिला बरे वाटले. परंतु, शिवानीच्या आग्रहाखातर रुग्णालयात न थांबता घरी उपचार घेऊ म्हणून बहीण-भाऊ घरी गेले. सोमवारी त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच शिवानीचा मृत्यू झाला.

नाशिकरोड पोलिस ठाण्यात आणि जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. हवालदार सुनील कोकाटे तपास करीत आहेत.