कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नाशिक शहरातील हा परिसर संपूर्णपणे लॉकडाऊन

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता माऊली लॉन्स ते प्रणव स्टॅपिंग लगतचा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. सदर परिसराला प्रशासनातर्फे बेरिकेटिंग करण्यात आली. अंबड औद्योगिक वसाहतीतील काही भागाचा देखील यात समावेश करण्यात आला आहे.

नवीन नाशिक प्रभाग सभापती दीपक दातीर यांच्या महालक्ष्मी नगर येथील कार्यालयात परिसरातील व्यावसायिकांची बैठक झाली. यावेळी प्रथम माऊली लॉन्स, डीजीपी नगर क्रमांक 2 ,फडोळ मळा, अंबड औद्योगिक वसाहतीतील प्रणव स्टॅम्पिंग पर्यंतचा परिसर सील करण्याचा निर्णय घेण्यात येऊन त्यात प्रशासकीय परवानगी मिळवून सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. आणि या ठिकाणी बेरिकेटिंग करण्यात आली. दरम्यान या आदेशात अंबड गावाचा देखील समावेश करण्यात आल्याने अंबड गावात रुग्ण नसल्याने सदर परिसराला बेरिकेटिंग करू नये असे म्हणत अंबड ग्रामस्थांनी त्यास विरोध दर्शविला होता मात्र पोलीस प्रशासन ,मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी अंबड ग्रामस्थ व भाजी मार्केट परिसरातील व्यवसायिकांना एकत्रित करून बैठक घेतली त्यात अंबडगाव व त्यालगत च्या परिसराला बेरिकेटिंग करण्यास ग्रामस्थांनी सहमती दिली. दि. 20 जुलैला प्राप्त झालेल्या आदेशानुसार पुढील चौदा दिवस सदर संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बंद असणार असून मेडिकल व दवाखाने सोडून इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

या बंदमध्ये किराणा दुकानाचा देखील समावेश करण्यात आला असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी ,नवीन नाशिक विभागीय अधिकारी संदेश शिंदे, नवीन नाशिक प्रभारी अधीक्षक दशरथ भवर, नगरसेवक राकेश दोंदे, माजी नगरसेवक तानाजी फडोळ, उत्तम दोंदे, साहेबराव दातीर, खंडू दातीर आदींसह अंबड ग्रामस्थ ,भाजी मार्केट मधील व्यवसायिक उपस्थित होते.