कोरोनाचा धोका टळलेला नाही; दिवाळी साजरी करताना काळजी घ्यावी : पालकमंत्री भुजबळ

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा प्रशासन, आरोग्य व पोलीस यंत्रणा यांनी रात्रंदिवस घेतलेली मेहनत तसेच नागरिकांचे सहकार्य यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग काही प्रमाणात रोखण्यास आपण यशस्वी होत आहोत; परंतु या विषाणूचा धोका अजून पूर्णतः टळलेला नसल्याने य विषाणुचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो, त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करताना देखील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हावासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा देताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना विषाणूचे प्रमाण कमी झाले असले तरी या विषाणूचा प्रादुर्भाव पुर्णतः संपलेला नाही. दिवाळीचा सण साजरा करताना नागरिकांनी या परिस्थितीचे भान ठेवून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही पालकमंत्री  भुजबळ म्हणाले यावेळी केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन दुकानदारांनी देखील विना मास्क असलेल्या व्यक्तींना वस्तूंची विक्री करून नये, तसेच जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणाना सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत. यादृष्टीने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. जेणेकरून दिवाळी सणांच्या दिवसात मास्कचा वापर करून स्वतःसोबत इतरांच्याही आरोग्याच्या रक्षणाची जबाबदारी नागरिकांनी घ्यावी, असे सांगून पालकमंत्री  भुजबळ म्हणाले, दिवाळी सणात फटाक्यांच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. कारण कोरोनाचा विषाणू हा फुफ्फुसावर मारा करीत असतो, त्यामुळे कोरोनाबाधित आणि कोमॉर्बिड लोकांना या धुराचा त्रास होण्याची शक्यता जास्त असल्याने मोठ्या आवाजाची व प्रदूषण निर्माण करणाऱ्या फटाक्यांचा वापर कमीत कमी करावा.

तसेच फटाके फोडताना लहान मुलांची काळजी घेण्यात यावी आणि सॅनिटाईजर हे ज्वलनशील असल्याने फटाक्यांजवळ सॅनिटाईजरचा वापर करू नये. दिवाळीचा सण आनंदात व उत्साहात साजरा करण्यासाठी शासनास व प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करण्याचेही आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.