कॉलेज रोडला महिलेचा मोबाईल, मंगळसूत्र हिसकावून केला पोबारा !

नाशिक (प्रतिनिधी): शहरात चोरटयांनी धुमाकूळ घातला असून, चैन स्नाचिंगच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यानुसार, कॉलेजरोड परिसरात एका महिलेकडून तिचा मोबाईल व मंगळसूत्र हिसकावून घेत, अज्ञात चोरटयांनी पोबारा केला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जोत्सना गोविंद जंगले (वय ६०) या प्रभू प्रसाद अपार्टमेंट, एचपीटी कॉलेज मागे, कॉलेजरोड परिसरात राहतात. सोमवारी (दि.११ जानेवारी) रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी स्वतःची गाडी पार्क करण्यासाठी राहत्या घराच्या बाजूला १०० मीटर अंदाजे अंतरावर गेल्या. दरम्यान, चारचाकी गाडी आणण्यासाठी जात असतांना अचानक एका दुचाकीवर २ अज्ञात इसम आले. त्यांनी फिर्यादीच्या हातातील ५ हजार किमतीचा मोबाईल व ८५ हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून, घेत पळ काढला.