केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने महिलेच्या खात्यातून ११ लाख लुटले

नाशिक (प्रतिनिधी): बँकेच्या खात्याचे केवायसी अपडेट करण्याचे कारण सांगून सर्व व्यक्तिगत माहिती विचारून घेतल्यावर ते हॅक करून खात्यातील रक्कम आणि त्याच्याशी संलग्न मुदत ठेवीवर त्वरित मिळणारे ओव्हरड्राफ्ट कर्ज मंजूर करून घेत ११ लाख ७३ हजारांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकमध्ये शुक्रवारी घडला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पल्लवी मंडलिक यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे सरकारी बँकेत खाते आहे. एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून त्यांना कॉल आला. बँकेचे प्रतिनिधी म्हणून बोलत असल्याचे सांगत तुमचे बँक खाते केवायसी अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगून सर्व माहिती विचारण्यात आली. त्यासाठी एक इ-मेल पाठविण्यात आला. त्याला उत्तर म्हणून सर्व माहिती भरण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर काही वेळातच इंटरनेट बँकिंगचा वापर करून खाते हॅक झाले. त्यातील शिल्लक रकमेबरोबरच खात्याशी संलग्न असलेल्या मुदत ठेवीवर ऑनलाइन ओव्हरड्राफ्ट कर्ज मंजूर करून घेण्यात आले व ही सर्व रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढून घेण्यात आली.

बँकेकडून या कर्जाबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे मंडलिक यांच्या लक्षात आले. त्वरित त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.