कांदा व्यापारी असल्याचे भासवून शेतकऱ्याला ५८ हजाराला गंडवणारा पंचवटी पोलिसांच्या ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी) : मटाने (ता. देवळा) येथील शेतकरी २९ क्विंटल ४५ किलो (६० गोणी) कांदा विक्रीसाठी नाशिक येथे घेऊन आले. दरम्यान, एका इसमाने कांद्याचा व्यापारी असल्याचे भासवून त्यांच्याकडून कांदा खरेदी करून ५८ हजार ५०० रुपये खरेदी किंमत न देता पोबारा केला.

बुधवारी (दि.१८ नोव्हेंबर ) रोजी फिर्यादी नानाजी निंबा साळवे (वय ५८, रा.मटाने ता.देवळा जि.नाशिक) हे शेतकरी आहेत. त्यांनी आपला २९ क्विंटल ४५ किलो ६० गोणी कांदा विक्रीसाठी मुन्ना ट्रेडिंग कं.शरदचंद्र पवार मार्केट पंचवटी नाशिक येथे आणला. दरम्यान, इजियाज अन्सारी (वय ५६) नामक व्यक्तीने तो कांद्याचा व्यापारी आहे असे सांगून साळवे यांचा विश्वास संपादन केला. तसेच साळवे यांच्याकडून कांदा २७ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करून, दुसऱ्याबाजूला मात्र, प्रत्यक्षात २० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केले. त्याचे एकूण ५८ हजार ५०० रुपये साळवे यांना न देता तेथून पोबारा केला. सदर गुन्ह्याची नोंद पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस शिपाई विलास चारोस्कर व नितीन जगताप यांनी पोलीस उपनिरीक्षक देसले व पोलीस शिपाई रामनाथ पाटील यांच्या मदतीने तपास सुरु केला. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने त्याचा तपास काढून त्याच्या मोबाईल क्रमांकावरून त्याचे लोकेशन काढून त्यास भिवंडी येथे दि.९ डिसेंबर रोजी अटक केली. सदर आरोपीवर मालेगाव, सटाणा, कन्नड औरंगाबाद येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.