कमरेला पिस्तुल आणि हातात कोयते घेऊन घरात शिरले अन….

नाशिक (प्रतिनिधी) : पंचवटी परिसरातील फुलेनगर येथे सोमवारी (दि.२६) सकाळी सराईत गुंडांच्या टोळक्याने घरात घुसून कोयत्याचा धाक दाखून महिलेला मारहाण करत सहा हजार रुपये चोरून नेल्याचा प्रकार समोर आलाय. फुलेनगर परिसरात राहणाऱ्या सोनी जाधव यांच्या घरात सकाळी ११ वाजेच्या सुमारास सहा जण प्रशांत जाधव, योगेश लांबडे, रोहन निकम, अंकुश सोनावणे, मयूर वाघमारे आणि जतीन साळुंखे शिरले.

घरात असलेल्या फिर्यादी यांच्या मावशी (राजश्री गुंजाळ)ला “तुला कापून टाकीन” अशी धमकी दिली आणि कमरेला पिस्तुल व हातात असलेल्या धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी सोनी जाधव यांच्यावर कोयत्याने वार करत असतांना तो वार चुकला आणि घरात असलेल्या आरशाला लागून आरसा फुटला. त्यानंतर घरातील गोदरेजचे कपाट खोलून त्यात असलेले सहा रुपये रोख रक्कम घेऊन संशयितांनी तेथून पळ काढला. या सगळ्या प्रकारानंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारांना खाकीचा वचक राहिला नाही अशी चर्चा होत आहे. याप्रकरणाविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.