कडवा कालव्यात चिमुकल्यानंतर वाहून आला मायलेकीचा मृतदेह!

नाशिक (प्रतिनिधी) : सिन्नर तालुक्यातील चांदगिरी गावात असलेल्या कडवा पाटात मंगळवारी (दि.०१) दुपारी १ वर्षीय बाळाचा मृतदेह वाहून आला होता. ही घटना ताजी असतांनाच काल (दि.०३) पुन्हा त्याच पाटात मायलेकीचा मृतदेह आढळून आला आहे. दिपाली पाडवी आणि त्यांची पाच वर्षांची मुलगी जयश्री पाडवीचा मृतदेह काल (दि.03) सकाळच्या सुमारास आढळून आला. सदर महिला आणि मुलगी शिंदेगाव येथील टोलनाक्याच्या मागे असलेल्या तुंगार चाळीतील राहणारी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आधी १ वर्षीय लहान चिमुकल्याचा आणि त्यानंतर मायलेकीचा मृतदेह पाटाच्या पाण्यात वाहून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.