एकीकडे बिलांची उकळणी ; दुसरीकडे ३० हून अधिक कोविड सेंटर्सची उभारणी…

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संकटाच्या काळी खाजगी रुग्णालयांकडून मात्र बिलांची मोठ्या प्रमाणात उकळणी करण्यात येतच आहे. दुसरीकडे कोविड सेंटर्सची देखील शहरात वेगाने उभारणी करण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांत शहरात नव्याने ३० हून अधिक कोविड सेंटर्सची उभारणी करण्यात आली आहे. अशी माहिती स्थायी समितीच्या बैठकीतून समोर आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या धोक्याला रोखण्यासाठी शहरातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांना देखील परवानगी दिली जाते. तसेच गरज असल्याकारणाने नवीन रुग्णालयांना नियमावलीनुसार परवानगी दिली जात असल्याचा खुलासा वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केला. एप्रिल महिन्यात शहरात कोरोनाचा एकच रुग्ण होता. परंतु, शहर अनलॉक झाल्यापासून शहरात कोरोनाची स्थिती भयंकर झाली‌ असून जूनपासून ते सप्टेंबरच्या दरम्यान कोरोनाचा उद्रेक झाला असून बाधितांची संख्या चक्क ५० हजारांवर जाऊन पोहोचली आहे. आणि मृत्यू संख्या  सातशेच्या पार आहे. तर दुसऱ्या बाजूला उपचार पद्धती मध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची कमतरता, मनुष्यबळाची कमतरता, खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची सुरू असलेली आर्थिक लूट, अपुऱ्या सोयीसुविधा इत्यादी महापालिका सेवा देण्यात कमी पडत असल्यामुळे कोविडच्या नावाखाली तीन ते चार लोक एकत्र येऊन शहरात तीन महिन्यात महापालिकेच्या परवानगीने शहरात बंद पडलेले किंवा निवासी भागात इमारती भाडेतत्त्वावर घेऊन रुग्णालये सुरू करत असल्याची माहिती सत्यभामा गाडेकर व कमलेश बोडके यांनी दिली. त्यामुळे अशा ठिकाणी रुग्णांचे संरक्षण कसे होणार तसेच योग्य त्या सोयीसुविधा नसताना या रुग्णालयांना परवानगी देण्यातच कशी आली असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे. सदस्यांनी केलेल्या आरोपाना उत्तर म्हणून वैद्यकीय विभागाने स्पष्टीकरण देताना म्हटले की, शहरात नव्याने क्लिनिक सुरू करण्यासाठी पालिकेच्या परवानगीची गरज नाही. परंतु १५ पेक्षा अधिक बेडसाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच शहरात सध्या ६५१ रुग्णालये असून त्यातील ६३ रुग्णालये कोविड सेंटर म्हणून घोषित करण्यात आली आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन रुग्णालयांना नियमावलीनुसार ही परवानगी देण्यात आली आहे. असे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले आहे.