उद्या कळणार महाविद्यालये सुरु होण्याची तारीख !

नाशिक (प्रतिनिधी): महाविद्यालये सुरु करण्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून निर्णय घेण्यात आला होता. मात्र, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी या निर्णयाला स्थगिती दिली होती. तर, राज्यभरातील महाविद्यालये एकदम सुरु करावीत असा निर्णय घेतला असून, २० जानेवारीला राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यभरातील शाळा सुरु झाल्या असून, महाविद्यालये मात्र, विद्यार्थ्यांविना ओस आहेत. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे हे नुकसान होऊ नये या हेतूने ११ जानेवारी रोजी नाशिक, नगर व पुणे या जिल्ह्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, डॉ.व्ही.बी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अकरा सदस्यीय बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, उच्चं व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

तसेच महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय सरकारचा होता, तर सुरु करण्याचा निर्णयही सरकारलाच घेऊ द्या, असे ही ते म्हणाले होते. तर, राज्यातील सर्व विद्यापीठाअंतर्गत असलेली महाविद्यालये एकदम सुरु करावीत असे कारण त्यांनी दिले होते. त्यानुसार, याबाबत २० तारखेला राज्यातील कॉलेजेस सुरु होण्याची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला विद्यापीठामार्फत महाविद्यालये सुरु करण्याबाबतची सॅनिटायझेशन, प्रयोगशाळांची सुसज्जता इत्यादी सर्व तयारी पूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.