ऑक्सिजन पुरवठ्याबाबत निर्णयाला उद्योजकांचा विरोध!

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता ऑक्सिजनचा तुटवडा होत असल्याने शनिवारी (दि.१२) जिल्हा आप्पती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे यांनी ऑक्सिजन उत्पादन करणारे उत्पादक आणि पुरवठादारांनी उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु यावर उद्योजकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील ओक्सिजनच्या वापरात समतोल आणावा अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात येत आहे.

जिल्हा ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांच्या झालेल्या बैठकीत सर्वात आधी रुग्णालयांना वैद्यकीय सुविधांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करावा त्यानंतर औद्योगिक वसाहतींच्या ऑक्सिजन पुरवठाबाबत पुढील निर्णय जिल्हाधिकारी घेणार असल्याचे निश्चित झाले. मात्र लॉकडाऊनमुळे ठप्प असलेल्या उद्योगांना आता कुठेतरी चालना मिळू लागल्याने गाडी पुन्हा रुळावर येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व बाजूंचा विचार करणे अपेक्षित असल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आज (दि.१४) जिल्हाधिकाऱ्यांना भेटून रुग्ण आणि उद्योग यांना दोघांनाही ऑक्सिजनपुरवठा कसा करता येईल याबाबत चर्चा करणार आहेत.