आजपासून शहरात हर्डइम्युनिटी तपासणीसाठी मोहीम ; बघा काय असेल सिरो सर्वेक्षण…

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात एकूण किती लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला हे तपासणीसाठी आज (दि.०९) पासून सिरो सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. ही मोहीम शनिवार (दि.०९) पासून सोमवार (दि.११) पर्यंत असे दोन दिवस राबवण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी शहरात एकूण ३० टीम कार्यरत राहतील.

या सर्वेक्षणामध्ये महापालिकेचे आरोग्य कर्मचारी अडीच हजार घरांमधील रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले जातील. त्यानंतर हे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील. प्रयोगशाळेत या रक्ताच्या नमुन्यांची अँटीबॉडी टेस्ट करण्यात येईल. अँटीबॉडी टेस्टिंगसाठी नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

प्रत्येक भागातील लोकसंख्या आणि राहणीमानानुसार वर्गवारी आखून अँटीबॉडी टेस्टिंग चे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील विविध भागांमधून १८ वर्षांच्या वरील वयोगटाचे स्ट्री आणि पुरुष असे दोन्ही प्रकारचे सॅम्पल महापालिकेचे आरोग्य कर्मचारी घेणार आहेत. रक्त घेण्यासाठी फक्त काही घरांचीच निवड करण्यात आली असून एका घरातील एकाच व्यक्तीला रक्ताचे नमुने द्यावे लागणार आहे. रक्त नमुना देतांना संबंधित नागरिकाची संमतीपत्रावर स्वाक्षरी घेणे बंधनकारक आहे.