आजपासून थिएटर, नाट्यगृहे उघडणार ; तर स्विमिंग पूलसाठीही परवानगी!

नाशिक (प्रतिनिधी) : दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमीदिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. मात्र, कोरोनाच्या संकट काळात ७ महिन्यापासून बंद असलेले नाट्यगृह तसेच मल्टिप्लेक्स आजपासून मराठी रंगभूमीदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरु झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला स्विमिंगपूल देखील सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सदर आदेश हे राज्याच्या मुख्य सचिवांकडून देण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून, लॉकडाउन लागू करण्यात आले होते. परंतु, हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकच्या माध्यमातून व्यवसाय तसेच छोटे मोठे उद्योगधंदे सुरु करण्यात आले होते. पण नाट्यगृह, मल्टिप्लेक्स तसेच स्विमिंगपूल इत्यादींना परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, आता राज्याच्या मुख्य सचिवांकडूनच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कलाकार तसेच कलाप्रेमी प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपली आहे.

तर स्विमिंगपूल व इनडोअर खेळाची मैदाने देखील सुरु झाली आहेत. परवानगी दिली असली तरी कोरोनाच्या संसर्गाच्या बचावासाठी राज्यशासनाकडून नियमावली लागू करून दिली आहे. तर या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमावलीनुसार, कंटेनमेंट क्षेत्र वगळता नाट्यगृह, मल्टिप्लेक्स व स्विमिंगपूल सुरु करायलाच परवानगी आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी सॅनिटायझर व सुरक्षित अंतर अपेक्षित आहे. नाटक तसेच सिनेमासाठी ५०% रसिकांना परवानगी आहे. सदर व्यावसायिकांना अखेर दिलासा मिळाला असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.