अवैध गुटखा तस्करीवर पोलिसांची कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या पोलीस प्रशासनाला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी घुटखा व मटकामुक्त उत्तर महाराष्ट्र अभियान राबविण्याचे आदेश दिले होते. या अभियानअंतर्गत मागील तीन महिन्यांच्या कालावधीत साधारणपणे ८३ संशयित आरोपींना पकडून पोलिसांनी सुमारे साडे तीन कोटींच्या गुटख्याची होणारी तस्करी थांबवली.

गुटखा बंदी हि फक्त कागदोपत्री न राहता ती खऱ्या स्वरूपात अंमलात आणली जावी यासाठी नाशिक परिक्षेत्रातील नाशिक,अहमदनगर, जळगाव , नाशिक ग्रामीण धुळे व नंदुरबार या पाच भागांतील पोलिसांनी चोरट्या मार्गाने होत असलेल्या तस्करीला आळा घालण्यासाठी सापळे रचले होते. नाशिक व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी १९ तर अहमदनगरमध्ये १२, धुळे व नंदुरबार मध्ये ५ गुन्ह्यांची पोलिसांनी नोंद केली आहे. या प्रकारे कारवाया करून संपूर्ण महाराष्ट्र गुटखा मुक्त करण्याचा संकल्प पोलिसांचा आहे.