अतिवृष्टी नुकसानीची १०९ कोटी मदत ; ३ लाख ६६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा!

नाशिक (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उशिरा का होईना पण सरकारकडून याची दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार ९१७ शेतकऱ्यांच्या खात्यात १०९ कोटी मदत जमा करण्यात आली आहे. तसेच उर्वरित रक्कम देखील जमा करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 आधीच कोरोनाच्या संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा देखील आर्थिक फटका बसला. जून व जुलै महिन्यात पावसाचा काही ठाव ठिकाण नव्हता मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार मुसळदार हजेरी लावली. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसामुळे राज्यात तसेच जिल्ह्यात पिकांची नासाडी झाली. तर दुसऱ्या बाजूला अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली, व शेतात पाणी साचून पिके सडली.

जिल्ह्यातील मका,कांदा,ऊस, सोयाबीन हि पिके आडवी झाली तर, बागलाणमध्ये डाळिंब तसेच निफाड व दिंडोरीत द्राक्षबागांना फटका बसला. या नुकसानीची भरपाई मदत राज्य शासनाकडून, दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार ही मदत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार होती. मात्र, तसे झाले नाही म्हणून शेतकऱ्यांमध्ये याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत होती. परंतु आता उशिरा पण  थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकांसाठी हेक्टरी १० हजार तर फळबागांसाठी २५ हजार मदत देण्यात आली आहे.